नागपूर: राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मागणी भाजप आमदारांकडून करण्यात येणार असल्याचे समोर आलंय. नागपूरमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयावरुन भाजप आमदार आक्रमक झाले आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या कामकाजावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप आमदारांकडून आजच्या अधिवेशनात तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार त्यांनी नियमबाह्यरीत्या आपल्या हाती घेतल्याचा आरोप भाजपाने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा नियमबाह्य नियंत्रण?
तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना शासनाकडून कोणतीही नियुक्ती नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद स्वतःकडे घेतल्याचा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप आहे. अधिकृत अधिकारांशिवाय प्रकल्पाचा ताबा घेतल्याने मोठा अनियमिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तुकाराम मुंडेंविरोधात भाजपचे आरोप काय?
समोर आलेल्या वृ्त्तानुसार, मुंडे यांनी स्मार्ट सिटीचे म्हणून काम करताना काही निवडक कंत्राटदारांना अवैधरीत्या मोठ्या रकमांचे पेमेंट केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, तुकाराम मुंडे यांनी काही महिला अधिकार्यांवर त्यांनी दमदाटी केली. दोन्ही प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाले होते, मात्र महाविकास आघाडी शासनकाळात राजकीय दबावाखाली कारवाई रोखली गेल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
बदल्यांमुळे मुंडे चर्चेत...
तुकाराम मुंडे यांची सतत होत असलेल्या बदलीमुळे ते चर्चेत असतात. सरासरी एक वर्ष एकाच ठिकाणी त्यांची नियुक्ती होते. तुकाराम मुंढे हे २००५ बॅचचे अधिकारी असून गेल्या २० वर्षांच्या कालावधीत त्यांची ही २४ बदल्या झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची ऑगस्ट २०२५ मध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.